Monday, 28 January 2019

भटकंती

आभाळमाथ्यावर लालबूद डोळ्याच्या गिधाडानं मेलेल्या जनावरावर नजर रोखावी , तसा काळ्या काळ्या ढगांच्या मागे लपून पाऊस या दारातून त्या दारात पसाभर पिठ , मिठाचे चार खडे आन चार दोन मिरच्या उसनवार मिळतील म्हणून माय सारखी पायपीट करत होती पाऊस उघडल्या पासून. चार दिवसापासून आज पावसानं थोडी उघाड दिली होती.
            पन्नासेक घराची वस्ती असलेलं गाव आधूनिकतेच्या सर्वच सुखसोईपासून काही युगे दूर होतं.  गावाला रस्ता नाही़ . गावात शाळा नाही. दवाखाना तर नाहीच नाही. माय एकूण एकोनपन्नास उंबर्यावर  पदर पसरून आली. पण एकानही मायच्या पदरात भीक घातली नाही. घरी आम्ही मायची वाट पहात होतो, आणि आल्यावर आपल्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून तोंडात येणारी लाळ गिळत होतो. मी सर्वात मोठा असल्यामुळे मी जरा जास्त खाईल म्हणून सर्वांना दम देत होतो. दोन भाऊ चार बहिणी आई आणी बाप मिळून एकून आठ जणाचं कुटूंब.
              चार दिवस सततधार पाऊस झाल्यामुळे गावाच्या बाहेर जाणे कोणालाच जमत नव्हते .गावापासून चार कोसावर दुसरं गाव तिथच काय ते एक वान्याचं दुकान आणि त्याचीच चक्की होती़ आठ मैल रोज गवताचा भारा डोक्यावर नेऊन विकायचा आणि आलेल्या पैशात किलोक भर पिठ थोडं तेल मिठ मिरच्या आणून  घर चालवायचं. आम्ही होतो तसेच गावातील सगळी कुटूंब असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गवत आणि उन्हाळ्यात मोळ्या लाकडं विकून आपला उदर निर्वाह चालवायचे. काहींच्या घरात जास्त माणसं असल्यामुळे कमाई जादा यायची. त्यांच्या घरात असेलही धान्य पण उसनवार कसी करणार. आणि हिनं नाहीच दिलं परत तर काय करायचं म्हणून मायला कोणीच उभं करत नव्हते. माय घरी आली आणि मागच्या भिंतीला पाठ लावून मटकन खाली बसली. आम्ही सहाही भावंड मायच्या जवळ प्रशनार्थक नजरेनं मायला पाहू लागलो. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. मग मी च मायला विचारलं  "भाकर नाय आनली  "? तसी मायनं शब्दही न काढता नकारार्थी मान हलवली.मी क्षणाचाही विलंब न करता भोकांड पसरलं. " मले भाकर पायजे." मायनं समजावण्याचा प्रयत्न केला." आता संद्याकायी तुवा बाप यीन. मंग तुयासाटी सेवपापळी आणिन. फुटाने आणिन. उस आणिन. मंग माया राजा गुटूगुटू खाईन." मी आणखी जोरात रडायला लागलो. "मले ऊस नायी पायजे भाकर देभूक लागली."
माय एकदम चिडली.
"भुक लागली तं खाय मले. नायीतरी काय रायलं जिवनात "...माय
"मले भाकर दे. मले भुक लागली.".....मी.
मायनं हात धरून जवळ ओढलं, आणि हातात लागील त्या वस्तूनं मारायला सुरूवात केली. मी आणखी जिव तोडू रडायला लागलो. बाकीची भावंड मायचा अवतार पाहून कोपर्यात दडून बसली. कोणाचाही आवाज नाही. मी मात्र बेंबीच्या देठापासून ओरडत होतो.कितीवेळ मायनं मारलं माहीत नाही. नंतर छातीसी धरून तीही हंबरून रडायला लागली. कोपर्यातली भावंड मायला रडतांना पाहून तिच्याजवळ येवून तिच्याही पेक्षा जोरात रडायला लागली. मी मात्र आता एकदम शांत झालो. मला काहीच कळत नव्हतं काय झालं. मारलं आपल्याला आणि रडते माय. मी स्वासावर नियंत्रण करत मायचे डोळे पुसायला लागलो. मायनं आणखी घट्ट मिठी मारली. त्यातच झोप कधी लागली कळलं नाही.
            संध्याकाळी बाप आला बापानं पिठ आणलं .मायनं स्वयंपाक केला. मिरच्या भाजल्या त्याचा ठचका बसला.पण वासानं आणखी भूक पेटली. मायनं एक भाकर अन् दोन मिरच्या ठेवलेलं ताट माझ्यापुढे सरकवलं. काहीही शब्द न बोलता मी भाकरीवर तुटून पडलो. मिरची लागली तोंडाची आग झाली. तसी माय म्हणाली......
" वधर पाय ते पाय काय आये "
जेवन झाल्याबरोबर मी झोपलो. भावंडही झोपली असतील. दुसर्या दिवशी आम्ही गावातून निघालो. माझ्या हातात एक पिशवी होती. त्यात काही घरात वापरावयाचे भांडे होते. मायच्या डोक्यावर एक गाठोडं होतं बापाच्याही डोक्यावर तसच काहीतरी होतं.गाव मायला आणि बापाला जावू नका म्हणून बोलत होते. मला किवा भावडांना काही कळत नव्हतं पण मी खुष होतो आपण गावाला जातोय म्हणून.
              पुढे आम्ही चालतच रात्र झाली की तिथच मुक्काम करत कोणत्यातरी मोठ्या गावात आलो. तिथ गावातल्या सारखी कौलाची घरं नव्हती .मकानच्या मकानच दिसत होती. फक्त आमच्यासाठी घर नव्हतं. चार बहीणींपैकी दोन मेल्या .मग एक भाऊ मेला. बापाला एक दिवस पोलीसानी पकडून नेलं . त्यादिवसी आम्ही खुप रडलो. माय पण रडत होती. त्या धक्यानं माय आजारी पडली. आपण परत गावाकडे जावू म्हणत होती. मी जायला तयार नव्हतो. कारण ईथं आल्यापासून एक दिवसही उपवास घडला नव्हता. रोज कही ना काही खायला मिळत होतं.
एक दिवस माय नं जिव सोडला. आम्ही अनाथ झालो. मायला
गाडीत टाकून नेलं. त्या दिवसा पासून आम्ही बापाचा शोध घेत त्याच गावात फिरतो आहोत.
कोणीच पत्ता सांगत नाहीत. आमची भटकंती थांबत नाही.
.

No comments:

Post a Comment

भटकंती

आभाळमाथ्यावर लालबूद डोळ्याच्या गिधाडानं मेलेल्या जनावरावर नजर रोखावी , तसा काळ्या काळ्या ढगांच्या मागे लपून पाऊस या दारातून त्या दारात पसाभर...